पुणे येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने शारदा गजाननच्या अवतीभवती विस्तारलेल्या मंडई या परिसराचे आणि तेथील अर्थगणिताचे अवलोकन करणे आवश्यक आहे. जाती-धर्माच्या व्यतिरिक्त गणपतीची सेवा हा भाव ठेवून अठरापगड जाती याठिकाणी व्यवसायात कार्यरत असलेल्या दिसतात. जसे की, आकर्षक पद्धतीने तयार केले गेलेले हार पत्री, कमळ, पूजेला लागणारी पाच फळं विकणारी बागवान मंडळी इथे आहेत. विड्याची पानं विकणारा तांबोळी समाज आहे. हिंदू संस्कृतीतील सणांचे पूजा साहित्य विकणारी मुस्लीम मंडळींकडे सर्वधर्मसमभावतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पुण्यातील मंडईमध्ये आहे.
मंडईमध्ये असलेल्या शारदा गणपतीमुळे मंडईमध्ये व्यवसायाचे एक जाळे विनले गेले आहे. 1894 साली शारदा गणपतीची मूर्ती स्थापित केली गेली. ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली गेलेली आहे. यामध्ये मुख्यतः पूजा साहित्य आणि सजावटीचं साहित्य आढळून येते.
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुख्यतः ऋषिपंचमीच्या वस्तू विक्रीस उपलब्ध होतात. खास बैलांच्या माध्यमातून शेती करून निर्माण झालेल्या वस्तू विक्रीस आणल्या जातात. या परिसरात विक्री करणारी मंडळी व्यावसायिक नसून स्वकष्टाने धान्याचं उत्पादन घेणारे आहेत. देवाची सेवा करणे, हा भाव त्यांच्या या व्यवसायात असलेला दिसून येतो. सोबतच धर्म उत्सवाच्या निमित्ताने त्यांना आर्थिक मिळकतही करता येते. यासोबतच व्यवहार बाजूला ठेवून अतिशय नाममात्र खर्चामध्ये गणपती मंडळांची परंपरेने सेवा करणारे मंडप व्यावसायिकही या परिसरात आढळतात. पिढ्यानपिढ्यापासून ते या व्यवसायात कार्यरत आहेत. पिढ्यानपिढ्यापासून चालले जाणारे व्यवसाय उत्सवाच्या माध्यमातून सांभाळले जात आहेत.. आणि अर्थकारणाला चालना देत आहेत.
उत्सवात कुठेही जातीधर्माचा विषय आढळत नाही. आग्रा जयपूरवरून मोरपीस आणून विकणारी मंडळी आहेत. गणेशोत्सवात कार्यरत असणार्या या व्यावसायिकांकडे एकात्मतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. माणूस जन्मला तेव्हा नाळ तोडण्यासाठी बांबूचा पेर वापरला जातो, कारण तो धारदार असतो. तो पेर आणि मृत्युनंतर तिरडी बांधण्यासाठी वापरले जाते, ते साहित्यसुद्धा याठिकाणी मिळते. एकूण ही बाजारपेठ सर्वसमावेशक स्वरूपाची आहे.
गणेशोत्सवाने बदलही स्वीकारले...
गणेशोत्सवाने आधुनिकीकरणासोबतच काही चांगले बदलही स्वीकारलेले दिसतात. या बदलांमध्ये पर्यावरणपूरकता हा घटक महत्त्वाचा आहे. पर्यावरणपूरकता जपण्यासाठी लाकडापासून बांबूपासून मखर बनवले जाते. आधुनिकीकरणाचा कल ओळखून गणपती पूजेचं किट, गौरी बिस्कीट अशा पारंपरिकतेला नव्याची जोड देणार्या वस्तूही सापडतात. गणपतीच्या सजावटीमध्ये प्रबोधन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परपंरा आणि विज्ञान यांचा मेळ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ते समाज जनजागृतीचे कार्यही या माध्यमातून करताना दिसतात. अप्रत्यक्षरीत्या सामाजिक समरसता उत्सवाच्या माध्यमातून साधली जाते.
गैरसोय झाली तरी तक्रार नाही...
गणेशोत्सवाच्या काळात विक्री करण्यास येणारे 80 टक्के लोक पुण्याबाहेरचे आहेत. रस्त्यावर राहताना आपली कुठलीही गैरव्यववस्था होतेय असा त्यांचा भाव नसतो. सर्व गैरसोयी सहन करत, त्यांची कुठल्याही स्वरूपाची तक्रार न करत ही माणसं इथे आपल्या वस्तूंची विक्री करत आहेत. या उत्सवाची सेवा करणे, हाच एक दृष्टिकोन येथे प्रकट होतो. स्वकष्टाने धान्याचं उत्पादन घेऊन याठिकाणी ॠषीपंचमीचा बाजार भरवला जातो. हे छोटे विक्री करणारे चार दिवस कुठे राहतात, काय खातात, याची आपल्याला माहिती नाही. तरी ते कुठलीही तक्रार न करता यादरम्यान आपल्या वस्तूंची विक्री वर्षानुवर्षे करत आहेत. उत्सवाच्या निमित्ताने यांच्याशी गाठीशी चार पैसे येत असतात.
एकूणच शारदा गजानन उत्सवामध्ये समाजोपयोगी अर्थकारण दडलेले आहे.





No comments:
Post a Comment