Tuesday, 8 October 2024

समाजाच्या उद्धाराचा वसा घेतलेलं श्रीकृष्ण मंडळ

    
                                                       


  • वर्षभर सामाजिक कामांसह समाजातील दरी मिटवण्यासाठी प्रयत्न
  • गणेशमंडळात मुस्लिम पदाधिकार्‍यांचाही सहभाग
पुण्यातील कॅम्प भागात विविध जाती, धर्माचे लोक एकोप्याने राहतात, सण उत्सव आनंदाने, उत्साहाने एकत्र येत साजरे करतात. गणेशोत्सवात दहा दिवस उत्साहाने काम करणारे कार्यकर्त्यांचे हात येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा करतानाही तेवढ्यात उत्साहाने पुढं येऊन जबाबदारी घेतात. हे सगळं साधलं गेलं ते कॅम्प भागातील श्रीकृष्ण गणेश मंडळामुळं. विशेष म्हणजे या मंडळात केवळ हिंदूच नाही तर; पदाधिकार्‍यांमध्ये मुस्लिमांचा देखील सहभाग आहे.

कॅम्पमध्ये १९९० साली स्थापन झालेल्या या मंडळानं यावर्षी मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यावर देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, केवळ मुंबईवर हल्ला झाला म्हणून ही तारीख लक्षात न ठेवता, या देशाला याच दिवशी संविधान मिळालं या उद्देशाने हा देखावा सादर करण्यात आल्याचे पदाधिकारी सांगतात. पदाधिकारी म्हणतात, “हे मंडळ ‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे चालणारे आहे. मंडळाच्या माध्यमातून जमा होणारे पैसे समाजाच्या सेवेसाठी वापरले जात आहेत. कर्मकांडावर पैसा व्यर्थ घालणे मंडळाला मान्य मान्य नाही. त्यांच्या मते, ईश्वराला या सगळ्याची इच्छाच नाहिये तर आपण ते सगळं त्याला देऊन वाया का घालवायचं? त्याऐवजी समाजसेवा केलेली उत्तम.”

श्रीकृष्ण मंडळ गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मिरवणूक काढत नाहीत. मिरवणुकीचा खर्च ते जाणीवपूर्वक टाळतात. तसेच देखाव्याच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश त्यांच्यातर्फे दिले जातात. जसे की, यावर्षी शेवटच्या दिवशी व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. मिरवणूक न काढता देखाव्यातून संदेश दिला जातो. शैक्षणिक, धार्मिक, आरोग्यविषयक कामांमध्ये हे मंडळ मदत करते.

सण, उत्सव एकत्रच केले जातात साजरे...

गोकुळ अष्टमीला मेहत्तर समाजाच्या माध्यामातून एक मिरवणूक काढली जाते. त्या मिरवणुकीमध्ये सर्व मंडळे मोठ्या उत्साहाने समाविष्ट होतात. तसेच इथे मुस्लीम समाजासाठी मानाचा असणारा ताबूत बसतो. मुस्लीम समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळेच श्रीकृष्ण मंडळ स्थापन केलेल्या रस्त्याला ताबूत स्ट्रीट म्हटलं जातं. हिंदूंचा उत्सव त्या रस्त्यावर साजरा होत असला तरी त्या रस्त्याचे नाव बदलले गेले पाहिजे अशा मागण्या कुठेही दिसून येत नाहीत. एकमेकांच्या धर्मभावनांचा रहिवासींकडून आदरच केला जात असल्याचे याठिकाणी दिसून येते.

स्थानिक कलाकारांची जोपासली कला...

मंडळाच्या माध्यमातून कलाकारांच्या कलागुणांना वाव दिला जातो. देखाव्यासाठी उभारलेला सेट हा कार्डावरील पेंटिंग आहे. हे पेंटिंग शौकत मुल्ला यांनी केले आहे. तीस वर्षांंपासून चित्रकला क्षेत्रात कार्यरत असणार्‍या मुल्ला यांना पैशाची कसलीही अपेक्षा नाही. ते मंडळाचे मुस्लीम कार्यकर्ते आहेत. श्रीकृष्ण मंडळ देखाव्यासाठी फ्लेक्स वगैरे न लावता अशा कलाकारांची कला जोपासतात. शिवाय अशा कलाकारांना आर्थिक मिळकत होईल, याचीही दक्षता मंडळाकडून घेतली जात आहे.

श्रीकृष्ण मंडळांचे वर्षभर काय करते...

- १५ ऑगस्ट, महिला दिन यादिवशीही वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते.
- गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बालगंधर्व रंगमंदिरात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते, त्या प्रदर्शनातून सात लाख वीस हजार रुपये जमा झाले. ते पैसे मंडळाने ससूनमधील सोफोश या संस्थेला देण्यात आले, जी अनाथ बालकांसाठी काम करते.
- महिलांसाठी पाककला, शिवणकला जसे की पिशव्या बनवणे, रांगोळी काढणे अशा कलागुणांचा विकास होईल असे उपक्रम राबवले जातात.

या मंडळाविषयी बोलताना अध्यक्ष विशाल ओव्हाळ म्हणतात की, 

"इथल्या परिसरात कोणालाही विचारलं की २६/११ काय आहे? तर त्याच्या डोक्यात फक्त हल्ला आहे. पण ७५ वर्षांपूर्वी भारताला सुपुर्द केलेलं संविधान नाही. आपण भारताचे नागरिक आहोत, पण ज्या संविधानाने हे नागरिकत्व त्यांना दिलं, ते संविधानच त्यांना माहीत नाही. तर त्याचा उत्सव गौरव आपण केला पाहिजे. प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला. जातिभेद इतका पसरला आहे की आता आडनावावरून जात ओळखण्याचा प्रयत्न करतात. संविधानाने सर्वांना समानता दिली आहे. संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य बंधुत्व आपण विसरलो आहोत. संविधानाचा सगळा गाभा एकत्र करून आपण जातिभेद नष्ट केले पाहिजेत. आपण प्रांतवाद सीमावाद यातच अडकून बसलो आहोत. ते नष्ट करण्यासाठी हा देखावा आहे. तो हल्ला महत्त्वाचा नव्हता ती तारीख महत्त्वाची आहे. हल्ला झाला आणि गेला पण ते संविधान तसंच आहे."







No comments:

Post a Comment

भाषांतर : संवेदनशील कथनकार

  ओल्गा तकारक्जुक  (नोबेल पुरस्कार, २०१८)         मी पहिल्यांदा कुठलं छायाचित्र जाणीवपूर्वक अनुभवलं असेल , तर ते माझ्या आईचं मला जन्म ...