Tuesday, 8 October 2024

भाषांतर : संवेदनशील कथनकार

 
ओल्गा तकारक्जुक (नोबेल पुरस्कार, २०१८)

        मी पहिल्यांदा कुठलं छायाचित्र जाणीवपूर्वक अनुभवलं असेल, तर ते माझ्या आईचं मला जन्म देण्याअगोदरचं होतं. दुर्दैवानं, ते एक ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र आहे. याचा अर्थ असा आहे, की त्यातील बरेच तपशील हरवले आहेत. राखाडी दृश्याशिवाय ते दुसरं काहीही दाखवित नाही. बहुधा वसंत ऋतूतील सौम्य आणि पावसाळी प्रकाश असेल, नक्कीच त्याच प्रकारचा प्रकाश खिडकीमधून झिरपत होता. तो प्रकाश जाणवण्याइतपत खोलीभर पसरला होता. माझी आई जुन्या रेडिओ शेजारी बसली आहे आणि तिच्या प्रेमळ हिरव्या डोळ्यांनी पाहत ती दोन डायल करते. एक - आवाज नियंत्रित करण्यासाठी आणि दुसरं - रेडिओ स्टेशन शोधण्यासाठी. नंतर हा रेडिओ माझ्या बालपणीचा महत्त्वाचा सोबती बनला; त्यातूनच मी विश्वाच्या अस्तित्वाबद्दल शिकले. लाकडी गुंडी फिरवल्यानं अँटेनाचं नाजूक फीलर हललं आणि त्याच्या कक्षेतून सर्व विभिन्न प्रकारचे स्टेशन बाहेर पडले- वॉर्सा, लंडन, लक्झेमबर्ग आणि पॅरिस. कधीकधी आवाज प्राग आणि न्यूयॉर्क किंवा मॉस्को आणि माद्रिद यांच्यात असा अडखळतो, की अँटेनाचं फीलर जणू ब्लॅकहोलमध्ये अडकलं आहे. जेव्हा जेव्हा असं घडतं, तेव्हा ते माझ्या पाठीच्या कण्यापर्यंत हुडहुडी भरवतं. या रेडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या सौर यंत्रणा आणि आकाशगंगा माझ्याशी बोलताहेत असा माझा विश्वास आहे. खरखर आणि लकेर घेत त्या कंपित सुरात गाणं म्हणतात. मला महत्त्वाची माहिती पाठवतात आणि तरीही त्याचा अर्थ लावण्यास मी असमर्थ आहे.

        जेव्हा मी एक लहान मुलगी म्हणून ते चित्र पाहत असे, तेव्हा आमच्या रेडिओवरील डायल चालू करून वळल्यावर सूक्ष्म हालचाली हेरणार्‍या रडारप्रमाणे माझी आई मला शोधतीय याची मला खात्री वाटे. तिनं विश्वाच्या अनंत क्षेत्रात प्रवेश केला, मी कधी आणि कुठून पोहचेन हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. साठच्या दशकाच्या प्रारंभिक काळात हे चित्र कधी घेतलं गेलं होतं हे तिचे विशिष्ट ठेवणीचे केस आणि कपडे (मोठा बोटनेक)[1] दर्शवितात. चौकटीच्या बाहेर कुठंतरी टक लावून पाहत, काहीशा बाक काढून बसलेल्या स्त्रीला असं काहीतरी दिसतं, जे नंतर छायाचित्र पाहत असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी उपलब्ध नसतं. लहान असताना मी कल्पना केली, की जे काही त्या वेळी घडत आहे तेच ती टक लावून पाहत होती. त्या चित्रात खरोखर काहीही घडत नाही शब्दांत व्यक्त करता येणारं ते छायाचित्र आहे, एक प्रक्रिया नाही. ती स्त्री दुःखी आहे. वरवर पाहता विचारात बुडालेली आहे जणू काही ती हरवली आहे.

       नंतर मी तिला त्या दु: खाबद्दल विचारलं, जे की मी असंख्य वेळा विचारलं होतं. नेहमीसारखा प्रोत्साहनपर प्रतिसाद देत माझी आई म्हणाली, की ती दुःखी आहेकारण मी अजून जन्मले नव्हते. तरीदेखील ती माझी आधीच आठवण काढतेय.

मी तिला विचारेल की, "मी अद्याप तिथे नसले तरी तू माझी आठवण कशी काढू शकतेस?"

मला माहीत आहे की तू एखाद्या गमावलेल्याला आठवत आहेस, ती उत्कंठा गमावल्याचाच एक परिणाम आहे.

तिनं उत्तर दिलं, "पण हे इतर मार्गानं देखील कार्य करू शकतं," "एखाद्या व्यक्तीची आठवण काढण्याचा अर्थ आहे की तिथं ती आहे."

        साठच्या दशकाच्या उत्तरार्धात पश्चिम पोलंडच्या ग्रामीण भागातील कुठंतरी वरील छोट्या संभाषणाची झालेली देवाणघेवाण, माझ्या आई आणि माझ्यातली, तिचं लहान मूल यांच्यातली देवाणघेवाण, अजूनही माझ्या आठवणीत त्याच अवस्थेत आहे आणि त्यानं मला आयुष्यभर पुरेल एवढी शक्ती दिली. जगातील सामान्य भौतिकता आणि सहज घटिताच्या पलीकडं कारण आणि परिणाम तसेच संभाव्यतेच्या नियमाच्या पलीकडं त्यानं माझं अस्तित्व उंचावलं आहे. तिनं माझं अस्तित्व कालबाह्य होण्याअगोदर मधुर चिरंतनाच्या सान्निध्यात स्थित केलं. माझ्यापेक्षाही माझ्या मुलाच्या मनात खूप काही आहे; ज्याची मी यापूर्वी कधीही कल्पना केली नव्हती, हे मला समजलं. आणि मी हरवले आहे,” असं जरी मी म्हणाले, तरी मी अजूनही मी आहेया शब्दापासून सुरुवात करत असेन - जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि विलक्षण शब्दांचा समूह.

        आणि म्हणून एक तरुणी जी कधीही धार्मिक नव्हती- माझ्या आईनं- मला एकदा आत्मा म्हणून ओळखलं जाणारं काहीतरी दिलं, त्याद्वारे मला जगातील सर्वोत्कृष्ट संवेदनशील कथनकार बनता आलं. 


        हे जग एक कापड आहे, ज्याच्यावर माहिती, चर्चा, चित्रपट, पुस्तकं, गप्पाटप्पा, छोट्या गमतीदार गोष्टी आदींनी आपण रोज विणकाम करतो. आज या विणण्याच्या प्रक्रियेची व्याप्ती प्रचंड आहे. जवळजवळ प्रत्येकानं या प्रक्रियेत जबाबदारीनं आणि बेजबाबदारपणे, प्रेम आणि द्वेषासह, चांगल्या आणि वाईटासाठी सहभाग घेतला आहे, त्यासाठी या इंटरनेटचे आभार. जेव्हा ही कथा बदलते, तेव्हा जग देखील बदलतं. या अर्थी, जग शब्दांपासून बनलेलं आहे.

 

        आपण जगाबद्दल कसा विचार करतो- कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे- त्यामुळे आपण त्याचं कथन कसं करतो याला एक भरीव अर्थ आहे. जी गोष्ट घडते आणि ती अस्तित्वात असल्याचं सांगितलं जात नाही, ती नष्ट होते. हे तथ्य केवळ इतिहासकारांनाच नाही तर राजकारणी आणि सत्ताधीश लोकांना (बहुतेक सर्वांपेक्षा जास्त) चांगलंच माहीत आहे. ज्याच्याकडं कथा आहे आणि जो विणतो त्याच्याकडं जबाबदारीही आहे.

        खोटं बोलणं आज आपली खरी समस्या बनल्याचं दिसतं. खरं तर आपल्याकडं कथन तयार नाही. फक्त भविष्यकाळासाठीच नाही, तर आजच्या जगाच्या अतिशय वेगवान कायापालटासाठी आपल्याकडं ठोस असं काहीही नाही. आपल्याकडं भाषेचा अभाव आहे.  दृष्टिकोन, रूपकं, मिथकं आणि नव्या मौखिक कथांची उणीव आहे. अद्याप आपल्याकडं भविष्यकाळातील कल्पनांमध्ये तंतोतंत न बसणार्‍या बुरसटलेल्या, कालबाह्य कथानकांना धरून ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो. नवीन काहीही नसण्यापेक्षा एखादी जुनी गोष्ट चांगली आहे, या गृहीतकाबद्दल काहीएक शंका नाही किंवा स्वत:च्या मर्यादित क्षितिजाला सामोरं जाण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. एका शब्दात सांगायचं झालं तर, जगाची कथा सांगण्याचे आपल्याकडे नवे मार्ग नाहीत.

 

        आपण प्रथम पुरुषी निवेदनाच्या बहुआवाजी पद्धतीत वास्तव्य करत असतो. बहुआवाजी पद्धतीच्या आवाजाला आपण सर्व बाजूंनी भेटतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की प्रथमपुरुषी निवेदनाची कथा जी फक्त स्वत:बद्दल आणि स्वतःच्या माध्यमातून कमी किंवा अधिक थेट लिहिते. थोडक्यात अशा एखाद्या कथा सांगणार्‍याच्या स्वत:च्या कक्षेकडं दुर्लक्ष करते. आपण निर्धारित केलंय की या प्रकारचे वैयक्तिक दृष्टिकोन, स्वतःचा आतला आवाज हा सर्वात नैसर्गिक आहे. प्रामाणिक आणि मानवी आहे, जरी तो व्यापक दृष्टिकोनापासून दूर राहिला असला तरी. प्रथम पुरुषी निवेदनामध्ये कथन करण्याचं योजलं तर नि:संशयपणे एक विलक्षण आकृतिबंध विणला जातो, त्या प्रकारचा एकमेव. स्वतःबद्दल आणि स्वतःच्या नियतीबद्दलची जाणीव असणार्‍या, वैयक्तिक स्वायत्ततेच्या भावनेला अर्थ आहे, तरीही याचा अर्थ असा आहे की स्वत:मध्ये आणि जगामध्ये विरोध निर्माण केला जातो आणि हा विरोध कधीकधी परस्परविरोधीही असू शकतो.

      मला वाटतं, प्रथम पुरुषी निवेदन ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि समकालीन दृष्टी आहे. ज्यामध्ये व्यक्ती जगाच्या व्यक्तिनिष्ठ केंद्राची भूमिका पार पाडते. पाश्चात्त्य संस्कृती अस्तित्वात असलेली एक महान संस्थापना आहे. ती स्वतःच्याच शोधावर अवलंबून आहे. आपल्या वास्तविकतेच्या सर्वात महत्त्वाच्या उपायांपैकी ती एक बनते. येथे माणूस मुख्य अभिनेता आहे आणि त्याची निर्णयक्षमता - ही बहुतेकांपैकी एक असली तरीही त्याला नेहमीच गांभीर्यानं पाहिलं जातं. प्रथम पुरुषी निवेदनात विणलेल्या कथा मानवी सभ्यतेच्या सगळ्यात मोठ्या शोधांमध्ये आढळतात. त्या श्रद्धेनं वाचल्या जातात. त्या पूर्ण आत्मविश्वास देतात. जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्यांद्वारे जग पाहतो; जे इतर कशासारखंही नसतं, तेव्हा या प्रकारची कथा कथनकर्त्याबरोबर एक विशेष बंध तयार करते, जो त्याच्या श्रोत्याला स्वतःला त्याच्या खास स्थानावर ठेवण्यास सांगतो. 

        साहित्यासाठी आणि  मानवी सभ्यतेसाठी प्रथम पुरुषी निवेदनानं जे केलं, त्यास अवास्तव महत्त्व दिलं जाऊ शकत नाही. त्यांनी जगाची कथा पूर्णतः नव्यानं रचली, जेणेकरून यापुढे नायक व देवतांच्या कार्यांची जागा राहणार नाही. ज्यावर आपला कोणताही प्रभाव असणार नाही, परंतु त्याऐवजी वैयक्तिक इतिहास असलेल्या आपल्यासारख्या लोकांसाठी एक स्थान मात्र असेल. आपल्यासारख्या लोकांना ओळखणं सोपं आहे, जे कथेचे कथनकर्ता आणि वाचक किंवा श्रोत्यांच्या समरसतेवर आधारित एक नवी भावनिक समजूत निर्माण करतात आणि हे अगदी स्वाभाविकपणे आणून सीमा काढून टाकतात. कादंबरीत स्वत: निवेदक आणि स्वतः वाचक यांच्या दरम्यानच्या सीमारेषांचा मार्ग गमावणं खूप सोपं आहे आणि एक तथाकथित लक्षवेधी कादंबरी” (Absorving novel) प्रत्यक्षरीत्या त्या सीमेवर अस्पष्ट गणली जाते- समरसतेद्वारे वाचक काही काळासाठी निवेदक बनतो. अशा प्रकारे अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी साहित्य हे एक क्षेत्र बनलं आहे, एक अॅगोरा[2] जिथं प्रत्येकजण स्वत:चे भवितव्य सांगू शकतो किंवा त्यांच्या बदलत्या अहंकाराला आवाज देऊ शकतो. म्हणूनच ती लोकशाहीची जागा आहे - कोणीही बोलू शकतो, प्रत्येकजण स्वत: साठी स्वतः आवाज निर्माण करू शकतो. मानवतेच्या इतिहासात इतके लोक, लेखक आणि कथा सांगणारे कधीच नव्हते. ही बाब खरी आहे हे पाहण्यासाठी आपल्याला फक्त आकडेवारी पाहावी लागेल.    

       जेव्हा जेव्हा मी पुस्तक प्रदर्शनांमध्ये जाते, तेव्हा पाहते की आज जगामध्ये स्व अधिकृत पुस्तके किती प्रकाशित होत आहेत आणि यासंबंधी नेमकं काय करावं लागेल. अभिव्यक्तीची अंतःप्रेरणा आपल्या जीवनाचं रक्षण करणार्‍या इतर प्रवृत्तींइतकीच प्रखर असू शकते आणि हे कलेतून पूर्णपणे प्रकट होते. आपल्याला लक्षात घ्यावंसं वाटतं, असामान्य अनुभवावं वाटतं. कथात्मकतेच्या विविधांगी पद्धतीनं, “मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहेकिंवा मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची कथा सांगणार आहेकिंवा अगदी, आजच्या सर्वात लोकप्रिय साहित्यिक शैलीत, मी कुठं होते याबद्दल सांगणार आहे.कारण आजकाल सर्व प्रकारचं लेखन करण्यास आपण सक्षम आहोत, ही देखील एक लक्षणीय घटना आहे आणि बरेच लोक ही क्षमता प्राप्त करतात. एकवेळ काहींसाठी स्वतःचे विचार, भावना, शब्द कथांमधून व्यक्त करणं संकोचाचं होऊ शकतं. विरोधाभासी, तथापि ही परिस्थिती चर्चमधील गायनस्थळातील गायकवृंदांत फक्त एकट्यानं गाणं म्हणणार्‍या गायकासारखी आहे. आवाज लक्ष्य वेधून घेण्यासाठी तसेच सगळे समान मार्गानं प्रवास करत एकमेकांचा आवाज दाबून टाकण्याची स्पर्धा करत आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल सर्व काही माहीत आहे, त्यांना ओळखण्यासाठी आपण सक्षम आहोत. त्यांचे जीवनानुभव जणूकाही आपले स्वतःचेच आहेत आणि तरीही, उल्लेखनीय म्हणजे बर्‍याच वेळा वाचकांचा अनुभव अपूर्ण आणि निराशाजनक असतो. कारण लेखकाचा "मी" सार्वभौमत्वाची हमी देऊ शकत नाही. आपण काय गमावत आहोत असे दिसतेकथेची व्याप्ती पाहता ती छोटी बोधकथा आहे. या बोधकथेचा नायक एकाच वेळी स्वतःच स्वतःचा आहे, विशिष्ट ऐतिहासिक किंवा भौगोलिक परिस्थितींमध्ये जगणारा एक माणूस, तसेच या ठोस मर्यादेपेक्षा अधिक मर्यादा ओलांडत गेलेला. तो त्याच वेळी सर्वसंचारी आणि सार्वत्रिक माणूस बनतो. जेव्हा एखादा वाचक कादंबरीत लिहिलेल्या एखाद्याच्या कथेचं अनुसरण करतो तेव्हा पात्राच्या वर्णनाचं विधिलिखित तो जाणू शकतो. त्याच्या परिस्थितीबद्दल विचार करू शकतो. जणूकाही ती त्याची स्वतःचीच आहे, असे असताना बोधकथेमध्ये त्यानं आपलं भिन्नत्व पूर्णतः त्यागलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस बनलं पाहिजे. मनोवैज्ञानिकदृष्ट्या मागणी असलेल्या या प्रक्रियेमध्ये बोधकथा विविध अनुभवांसाठी सामान्य विभाजक (denominator) शोधून आपला अनुभव सार्वत्रिक बनवते. आपण बोधकथेच्या दृष्टिकोनाची कसोटी गमावली आहे, हे आपल्या वर्तमानकालीन असहायतेचं लक्षण आहे.      

        क्रमश: शीर्षकं आणि आडनावं यांच्या विविधतेत दबून न जाता आपण कदाचित साहित्याच्या लिव्हाइअथन[3] शरीराला विविध शैलींमध्ये विभागू लागलो आहोत. जसं आपण लेखकांना खास प्रशिक्षित खेळाडू समजून खेळाच्या विविध प्रकारांप्रमाणे वागवतो. 

       साहित्यिक बाजारपेठेची सामान्य व्यापारीकरणामुळे (General commercialization) विविध शाखांमध्ये विभागणी झाली. आता या किंवा त्या प्रकारच्या साहित्याची प्रदर्शनं आणि महोत्सव होतात, ते पूर्णपणे वेगळे आहेत. गुन्हेगारीप्रधान कादंबरी, कल्पनारम्य किंवा विज्ञानकल्पित कथा वाचणार्‍या उत्सुक वाचकांचे ते ग्राहक तयार करतात. या परिस्थितीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालयांना त्यांच्या शेल्फवर मोठ्या प्रमाणात प्रकाशित पुस्तकांचे आयोजन करण्यास आणि ऑफरच्या विशालतेत वाचकांना स्वत:कडे खेचण्याला मदत करणारी, एक अमूर्त श्रेणी बनली. ज्यामध्ये केवळ विद्यमान कामं स्थित केली गेली नाहीत, तर त्यानुसार लेखकांनी स्वत: लेखन सुरू केलं आहे. शैलीचे वाढत्या प्रमाणातील कार्य हे एक प्रकारच्या केकच्या साच्यासारखे आहे, जे अगदी समान परिणाम देते. अभिजात भविष्यसूचकता लक्षात घेता, त्यांची कामगिरी क्षुल्लक गोष्ट आहे. काय अपेक्षा करावी हे वाचकांना माहीत असतं आणि जे हवं असतं ते मिळतं.

        लेखकीय स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या आदेशांना नेहमीच अंत:प्रेरणेनं मी विरोध केला आहे. सर्वसाधारणपणे संशोधन आणि उल्लंघन करण्याविषयीची अनिच्छा हे सृष्टीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय कला नसलेल्या कोणत्याही विलक्षणपणास सर्जनशील प्रक्रियेमधून ते पूर्णतः वगळतात. एका चांगल्या पुस्तकासाठी त्याच्या शैलीशी संलग्न असणे आवश्यक नाही. शैलींमध्ये विभाजन करणे म्हणजे सर्व साहित्याचे व्यापारीकरण, ब्रँडिंग, लक्ष्यीकरण आणि आधुनिक भांडवलशाहीच्या तत्सम आविष्कारांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानासह विक्रीसाठी उत्पादन म्हणून हाताळण्याचा परिणाम आहे.   

        पडद्यावरील मालिकांद्वारे पूर्णपणे नवीन मार्गानं जगाच्या कथा सांगण्याच्या नवीन लोकोपवादात्मक पद्धतीचा उदय पाहून आज आपल्याला खूप समाधान वाटतं. त्यातील छुपे कार्य म्हणजे आपल्यात एक मोहमयी अवस्था निर्माण करणं. कथा सांगण्याची ही पद्धत निश्चितच मिथकाच्या आणि होमेरिक[4] कथेच्या स्वरूपात फार पूर्वीपासून जिवंत आहे. आणि निःसंशयपणे या मालिकेतील पहिले नायक हर्क्युलिस, अखिलीस किंवा ओडिसीस आहेत. परंतु यापूर्वी कधीही अशा पद्धतीनं इतकी जागा घेतली नव्हती किंवा सामूहिक कल्पनेवरही त्याचा इतका प्रभाव पडला नव्हता. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत या मालिकांची सत्ता आहे. जगाची कथा सांगण्याच्या पद्धतींवर त्यांचा (आणि त्या कारणामुळेच ती गोष्ट समजण्याच्या आपल्या पद्धतीवरसुद्धा) क्रांतिकारी प्रभाव आहे. 

 

       विविध दृष्टिकोनातून पाहता, सध्याच्या मालिकेने फक्त आपल्या कथात्मक ऐहिक आवाक्याच्या सहभागाला विस्तारितच केलं नाही, तर विभिन्न लयी, शाखा आणि पैलूंना निर्माण केलं आहे, तथापि आपल्या नव्या आदेशांचीदेखील ओळख करून दिली. बर्‍याच प्रकरणांमध्ये त्याचे कार्य शक्य तितक्या काळ दर्शकांचे लक्ष वेधून घेणं आहे - एकदा का शास्त्रीय ऑपेराने डेइउस ऐक्स मॅकिनापासून[5] तडजोड केली की मालिका कथात्मकतेतील धाग्यात वाढ करते. असंभाव्य पद्धतीनं एकत्र गुंफते, इतके की जेव्हा नुकसान होते, तेव्हा अगदी जुने कथात्म तंत्र पूर्वपरिस्थितीवर येते. नवीन भागांच्या निर्मितीमध्ये बर्‍याचदा पात्रांच्या मनोविज्ञानाची तात्पुरती तपासणी केली जाते, जेणेकरून ते कथानकाच्या विकसनशील घटनांमध्ये अधिक चपखल बसू शकेल. सभ्य आणि भिडस्तपणा राखून सुरुवात करणारं एक पात्र, जे खुनशी आणि हिंसक शेवट करतं. साहाय्यभूत पात्र प्रमुख व्यक्तीच्या भूमिकेत बदलतं, तर मुख्य पात्र, ज्याच्याशी आपण आधीपासूनच जोडलेले असतो ते महत्त्व हरवून बसतं किंवा वास्तविकतः पूर्णपणे अदृश्य होतं. हे आपला गोंधळ उडवण्यास पुरेसं आहे.           

         एखाद्या सीझनच्या निर्मितीची संभाव्यता उघड शेवटाची गरज निर्माण करते. ज्यामध्ये विरेचन नावाच्या रहस्यमय गोष्टी उद्भवू शकतात किंवा त्यांचे पूर्णपणे पुनरुत्थान होऊ शकत नाही, असं म्हणण्याशिवाय कोणताही मार्ग नाही. पूर्वीच्या काळी विरेचन म्हणजे अंतर्गत कायापालटाचा, कथा सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याच्या परिपूर्तीचा तसाच समाधानाचा अनुभव होता. निष्कर्षाऐवजी अशी गुंतागुंत अखंड लांबणीवर टाकलेला मोबदला म्हणजे विरेचन आणि हेच विरेचन दर्शकाला परावलंबी बनवून संमोहित करतं. फार पूर्वी निर्मिती केलेल्या आणि शेहेरजादेच्या[6] कथांमधून प्रसिद्ध असलेल्या फॅबुला इंटरप्टानं[7] मालिकेत आता धैर्यानं पुनरागमन केलं आहे. आपल्या आत्मनिष्ठतेचं स्वरूप पालटलं आणि हे मानसिक स्वरूपाचे परिणाम आहेत. आपल्याला स्वतःच्या आयुष्यातून आवेगानं बाहेर काढून टाकलं जात आहे आणि प्रेरणा देणारी कोणतीही गोष्ट म्हणून संमोहित करत आहे. त्याच वेळी, मालिका जगतातील नवीन, दीर्घ आणि ओबडधोबड लय, तिचं गोंधळलेलं संप्रेषण, अस्थिरता आणि तरलता, हा कथा सांगणारा फॉर्म बहुधा सर्वात सर्जनशीलपणे आज नवीन सूत्र शोधत आहे. त्या अर्थानं मालिकांमधून भविष्यातील कथात्मकतेवर गंभीररीत्या काम केलं गेलं आहे. आपल्या वास्तवाला शोभेल अशी कथेची पुनर्मांडणी केली आहे.

       परंतु यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण अत्यंत परस्परविरोधी जगात, परस्परांच्या मर्यादित तथ्यांसोबत सर्वशक्तिनिशी लढा देत जगत आहोत.

       आमच्या पूर्वजांचा असा विश्वास होता, की ज्ञानापर्यंत पोहोचल्यामुळं  केवळ लोकांना आनंद, कल्याण, आरोग्य आणि संपत्ती मिळणार नाही, तर समान व न्याय्य समाज देखील निर्माण होईल. जगाला ज्या गोष्टींची कमतरता वाटते ते म्हणजे माहितीतून नैसर्गिकरीत्या उत्पन्न होणारं सर्वव्यापी ज्ञान होतं.

     सतराव्या शतकातील महान अध्यापक जॉन अमोस कॉमेनिअस[8] यांनी पन्सोफिजम[9] नावाची नवीन संज्ञा मांडली. त्यांच्या मते त्याचा अर्थ असा होता की, संभाव्य सर्वज्ञता दर्शविणारी कल्पना, वैश्विक ज्ञान त्यात सर्व संभाव्य अनुभूतीचं ज्ञान समाविष्ट असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकासाठी ज्ञानाचं स्वप्नदेखील उपलब्ध होतं. जगाविषयीची वस्तुस्थिती मिळवण्यापासून अशिक्षित व्यक्ती वैयक्तिक विचारमग्न भिडस्ततेने स्वतःचं आणि जगाचं प्रतिबिंबित करणारं रूपांतर करेल? सहज स्वाभाविक मिळालेल्या ज्ञानाचा अर्थ असा नाही की लोक समंजस होतील. ते आपल्या आयुष्यातील प्रगती समतेसह आणि चतुराईनं निर्देशित करतील का? जेव्हा इंटरनेट उदयास आलं, तेव्हा असं वाटलं होतं की या कल्पनांना शेवटी अभूतपूर्व प्रमाणात निर्माण करण्याची संधी मिळेल. विकिपीडिया, ज्याची मी स्तुती करते आणि त्याला समर्थनही देते. कॉमेनिअसला असं वाटू शकतं, की त्याच प्रवाहातील इतर अनेक समविचारी तत्त्ववेत्त्यांप्रमाणे मानवतेच्या स्वप्नपूर्तीसाठी- आता आपण पृथ्वीवरील अक्षरशः कुठूनही लोकशाही मार्गानं उपलब्ध होणारं प्रचंड प्रमाणातील अद्ययावत, पूरक ज्ञान प्राप्त आणि निर्माण करू शकतो.   

        परिपूर्ण स्वप्नं आपल्याला बर्‍याचदा निराश करतात. हे निष्पन्न झालं आहे की, ही विपुल माहिती हाताळण्यास आपण सक्षम नाहीत. एकत्रित होण्याऐवजी सामान्यीकरण आणि मुक्त करण्याऐवजी प्रत्येक छोट्या फुग्यांमध्ये बंदिस्त, भिन्नत्व, विभाजित केलं आहे. एकमेकांच्या विरोधात उभं राहण्यासाठी एकमेकांसह किंवा अगदी उघडपणे विवादास्पद अथवा थेट प्रतिकूल अशा असंख्य कथा तयार केल्या आहेत.       

      शिवाय, इंटरनेट पूर्णतः आणि अमर्यादितपणे बाजारप्रक्रियेच्या अधीन आहे; मक्तेदारीला समर्पित आहे.  प्रचंड माहिती स्रोताच्या नियंत्रणासाठी, माहितीच्या विस्तृत प्रवेशासाठी अजिबात पेन्सोफिकली[10] वापरली जात नाही, परंतु त्या विरुद्ध वापरकर्त्यांच्या वर्तणूक सेवा देणार्‍या कार्यक्रमातून प्रदान केली जाते, जे आपण नंतर केंब्रिज पृथक्करणात्मक चिकित्सेनंतर शिकलो. जगाचा सुसंवाद ऐकण्याऐवजी आपण गोंगाटाचा आवाज ऐकला. एक असह्य निष्क्रिय आवाज; ज्यामध्ये आपण सर्वात शांत, सर्वात कमकुवत लय समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सुप्रसिद्ध शेक्सपियरचे उदाहरण आजच्या नवीन कर्कश्य वस्तुस्थितीसाठी यापेक्षा अधिक चपखल कधीच बसलं नव्हतं : इंटरनेट ही एक आवाजी, त्वेषपूर्ण, अधिकाधिक वेळा मूर्खाकडून सांगितली गेलेली कथा आहे.

         दुर्दैवानं राजकीय शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनातून जॉन आमोस कॉमेनिअस यांच्या अंतर्ज्ञानालाही विरोध केला आहे. जे निश्चितपणे या विश्वासावर आधारित होतं की, जगाविषयी जितकं जास्त वैश्विक ज्ञान उपलब्ध आहे, तितकंच अधिक राजकारणी कारणांचा वापर करतात. विवेकी निर्णय घेतात. परंतु ही इतकी साधी बाब नाही असं दिसतं. ज्ञान जबरदस्त असू शकतं. त्याची जटिलता आणि संदिग्धता- नकार ते दडपशाही, अगदी सुबोध वैचारिक, पक्षवादी-विचारसरणीच्या सोप्या तत्त्वांना पाळण्यासाठी, सर्व प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचा उदय करते. कल्पित कथा म्हणजे काय याबद्दल बनावट बातम्यांची शृंखला नवे प्रश्न उपस्थित करते. ज्या वाचकांना वारंवार फसवलं गेलं, चुकीची माहिती दिली गेली किंवा ज्यांची दिशाभूल केली गेली, असे लोक हळूहळू विशिष्ट संवेदनाक्षम वर्तणुकीची सुरुवात करत आहेत. अशा साहित्यिक मरगळीची प्रतिक्रिया व्यावसायिक साहित्यास मोठ्या प्रमाणात यश मिळवून देऊ शकते. जी या महान माहितीच्या गोंधळात आपल्या डोक्यावरून जाणारा संदेश देते: "मी तुम्हाला खरं सांगते, खर्‍याशिवाय काही नाही." आणि "माझी कथा तथ्यावर आधारित आहे!"

        कल्पित वाङ्मयानं वाचकांचा विश्वास गमावला आहे, कारण खोटं बोलणं हे एक प्राचीन साधन असलं तरी ते लोकांच्या विध्वंसाचं एक विनाशक हत्यार बनलं. बर्‍याचदा मला विलक्षण प्रश्नांचा सामना करावा लागतो: "मग तू जे लिहीत आहेस ते खरं आहे का?" प्रत्येकवेळी हा प्रश्न म्हणजे साहित्याच्या मृत्यूबद्दलचे भाकीत आहे, याची मला जाणीव होते.

         वाचकांच्या दृष्टिकोनातून हा एक निर्दोषपणे विचारलेला प्रश्न आहे, जो लेखकाच्या कानांना खरोखर साक्षात्कारासारखा वाटतो. मी काय उत्तर द्यावं? हंस कॅस्टॉर्प[11] अॅना कॅरेनिना[12] किंवा विनी द पूह[13] यांची मौलिक स्थिती कशी स्पष्ट करावी?  

        मी या प्रकारच्या वाचकांच्या उत्सुकतेला समाजसंस्कृतीची अधोगती मानते. याचा अर्थ असा, की आपल्या बहुआयामी क्षमता (गोचर, ऐतिहासिक, परंतु प्रतीकात्मक, मिथकात्मक) देखील आपले जीवन घडविणार्‍या घटनांच्या साखळीत सक्रिय सहभागी होताना कमकुवत होताहेत. जीवन विविध घटना-प्रसंगांद्वारे निर्माण केलं जातं, परंतु जेव्हा आपण त्यांचा अर्थ लावण्यास सक्षम असतो, तेव्हाच त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात अर्थाची भर घालून त्यांना अनुभवात रूपांतरित करतो. घटनांमध्ये तथ्य आहे, परंतु अनुभव ही काहीतरी गूढ गोष्ट आहे. आपल्या आयुष्याचा विषय बनणार्‍या या घटना नव्हे तर अनुभव आहेत. अनुभव हे तथ्य आहे, ज्याचा अर्थ लावला गेला आहे. त्याला आपल्या स्मृतीत प्रस्थापित केलं आहे. तो आपल्या मनात असलेल्या एका विशिष्ट पायाला संदर्भित करतो. अर्थांच्या सखोल संरचनेवर अवलंबून असतो. ज्यावर आपण स्वतःचं जीवन उलगडू शकतो. समग्र व काळजीपूर्वक त्याचं परीक्षण करू शकतो. माझा असा विश्वास आहे, की मिथक अशा संरचनेची भूमिका बजावतं. वास्तवात मिथक कधी घडलेलं नसतं हे सर्वश्रुत आहे, परंतु ते सतत कार्यरत राहतं. आज ते केवळ प्राचीन नायकांच्या साहसांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत नाही, खेरीज त्याऐवजी त्यांचे मार्ग आधुनिक सिनेमा, खेळ आणि साहित्याच्या सर्वव्यापी तसेच लोकप्रिय कथांमध्ये प्रवेश करतात. माऊंट ऑलिंपसमधील रहिवाशांचं जीवन डायनेस्टीकडं[14] हस्तांतरित केलं गेलं आहे आणि नायकांच्या शौर्यपूर्ण कृत्यांची लारा क्राफ्टद्वारे[15] हजेरी लावली जात आहे.

        खर्‍या आणि खोट्या गोष्टींच्या या उत्कट भागामध्ये साहित्यानं रचलेल्या आपल्या अनुभवाच्या कथेला स्वतःचे आयाम आहेत.     

       कल्पित वाङ्मय आणि वास्तवाधारित लेखन यांच्यातील साध्या भेदाबद्दल मी कधीच उत्साही नव्हते, जोपर्यंत आपल्याला असं घोषणात्मक आणि विवेकी असल्याचं समजलं जात नाही तोपर्यंत. कल्पित कथांच्या बर्‍याच पारिभाषिक समुद्रात सर्वात जुनी असूनही मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट अॅरिस्टॉटलकडून येते. कल्पित कथा नेहमीच एक प्रकारचं सत्य असतं. 

       लेखक आणि निबंधकार ई. एम. फोर्स्टर[16] यांनी रचलेल्या सत्यकथा आणि कथानक यांच्यामधील फरकांबद्दल मला खात्री पटली. ते म्हणाले, की जेव्हा आपण म्हणतो, “राजा मेला आणि मग राणी मरण पावली,” ही एक कथा आहे. पण जेव्हा आपण म्हणतो, “राजा मरण पावला आणि मग शोकामुळे राणी मरण पावली,” तर हे कथानक आहे. प्रत्येक कल्पित गोष्टीचं स्वरूप "पुढं काय झालं?" या प्रश्नाच्या संक्रमणात आहे. आपल्या मानवी अनुभवावर आधारित ते समजून घेण्याच्या प्रयत्नात : "हे असं का घडलं?"

        साहित्याचा प्रारंभ त्या "का?" ने होतो, जरी आपण या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाहीअसं वारंवार देत असलो तरीही. 

        अशा प्रकारे साहित्य असे प्रश्न उभं करतं, की ज्याचं उत्तर विकिपीडियाच्या मदतीनंही दिलं जाऊ शकत नाही. कारण ते आपल्या अनुभवांचा थेट संदर्भ देत माहिती आणि घटनांच्या पलीकडं जातं.      

        तथापि हे शक्य आहे की कादंबरी आणि सर्वसाधारणपणे साहित्य आपल्या डोळ्यांसमोर इतर कथात्म पद्धतीच्या तुलनेत अगदी किरकोळ बनलं आहे. प्रतिमेचा प्रभाव आणि थेट प्रक्षेपण करणार्‍या अनुभवाच्या नव्या पद्धती सिनेमा, छायाचित्रण, आभासी वास्तव - पारंपरिक वाचनासाठी आवश्यक पर्याय म्हणून उदयास आले आहेत. वाचन ही एक पूर्णपणे किचकट अशी मानसिक आणि आकलनशक्तिबाबतची प्रक्रिया आहे. हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर: पहिली गोष्ट म्हणजे, सर्वात कठीण माहिती संकल्पनात्मक आणि शब्दांकित केली जाते. ती चिन्ह आणि प्रतीकांमध्ये रूपांतरित होते. त्यानंतर तिचे भाषेतून अनुभवात लिप्यंतर केले जाते. यासाठी विशेष बौद्धिक क्षमता आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याकडे लक्ष देण्याची, लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे; आजच्या अत्यंत विचलित करणार्‍या जगात ही कौशल्ये दुर्मीळ आहेत.

        मानवतेनं स्वत:चा अनुभव सांगून संवाद साधण्याच्या मार्गानं मौखिकतेपासून जिवंत शब्दावर, मानवी स्मरणशक्तीवर अवलंबून राहून गुटेनबर्ग क्रांतीपर्यंत बराच लांबचा पल्ला गाठला आहे. लेखनाच्या माध्यमातून कथा जेव्हा मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागल्या, तेव्हा जतन करून त्यांचं संहिताकरण केलं गेलं, शिवाय कुठल्याही फेरफाराशिवाय पुनरुत्पादन केलं. या परिवर्तनाची सर्वात मोठी प्राप्ती म्हणजे आपण भाषेसह, लेखनासह विचार ओळखला. आज आपल्याकडं स्पष्टपणे तितकीच उल्लेखनीय क्रांती होत आहे, जिथं मुद्रित शब्दांची मदत न घेता अनुभव थेट प्रसारित केला जाऊ शकतो.   

         जेव्हा आपण सहजपणे छायाचित्र घेऊ शकतो, ती छायाचित्रं सोशल मीडियाद्वारे जगामध्ये एकाचवेळी प्रत्येकाला त्वरित पाठवू शकतो, तेव्हा ट्रॅव्हल डायरी ठेवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला यापुढे पत्रं लिहिण्याची आवश्यकताही नाही, कारण फोन करणं खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही पर्याय म्हणून दूरदर्शनवरील मालिकेत स्वत:ला गुंतवून घेऊ शकता, तेव्हा जाडजूड कादंबर्‍या का लिहाव्यात? मित्रांसह गावात बाहेर जाण्याऐवजी खेळ खेळणं चांगलं. मी एक आत्मचरित्र वाचलं पाहिजे? त्यात काही तथ्य नाही. मी इन्स्टाग्रामवरील सेलेब्रिटींना फॉलो करून त्यांच्या जीवनाचं अनुसरण करते आणि त्यांच्याबद्दल सर्वकाही माहीत करून घेते. 

        विसाव्या शतकात जेव्हा दूरदर्शनच्या आणि चित्रपटाच्या प्रभावामुळं आपल्यात चिंता निर्माण झाली होती, तेव्हा आपण आतापर्यंत असंच पाहिलं आहे, की ही प्रतिमा आजपर्यंत मजकूराला विरोध करणारी नाही. त्याऐवजी आपल्या जगाचा अनुभव घेण्याच्या दृष्टीनं हा वेगळा आयाम आहे. जो आपल्या देहभानावर थेट प्रभाव पाडतो.


       मला जगाविषयीच्या सर्वंकष दृष्टिकोनातील पेचप्रसंगाचं कथन करणार्‍या कथांचं रेखाटन करायचं नाही. तथापि, जगामध्ये काहीतरी उणीव आहे, या भावनेनं मी बर्‍याचदा चिंतीत होते. काचेच्या स्क्रीनद्वारे आणि अॅप्लिकेशन्सद्वारे आपण अनुभव घेतो. असं असलं तरी ते दूरचं, द्विमितीय, विस्मयकारकपणे अवर्णनीय अवास्तव बनलं आहे, तरीही माहितीचा एखादा विशिष्ट तुकडा शोधणं अत्यंत सोपं आहे. आजकाल, 'कुणीतरी', 'काहीतरी', 'कुठंतरी', 'काही वेळ' या चिंताक्रांत शब्दांपेक्षा निश्चित, विशिष्ट कल्पना पूर्ण स्पष्टतेनं उच्चारल्या जातात. जसं की, “पृथ्वी सपाट आहे”, लस जीव घेतात”, “हवामान बदल हा मूर्खपणा आहेकिंवा जगात कुठंही लोकशाही धोक्यात येत नाही.” “कुठंतरीलोक समुद्र ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना बुडत आहेत.कुठंतरी” “काहीकाळापासून "काही ना काही" युद्ध चालू आहे. माहितीच्या महापुरात वैयक्तिक संदेश त्यांचं स्वरूप गमावतात, आपल्या स्मरणशक्तीमध्ये विलीन होतात. अवास्तव बनतात. अदृश्य होतात.   

        मूर्खपणा, क्रौर्य, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराच्या प्रतिमांचा हा पूर सर्व प्रकारच्या 'चांगल्या बातमी' द्वारे अविचारानं तोडीस तोड देत आहे. परंतु त्यात वेदनादायक ठसा उमटण्याची क्षमता नाही. जे मला शब्दांकित करणं कठीण वाटतं, ते म्हणजे जगामध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे. आजकाल ही भावना, एकेकाळी संवेदनशील कवींचा आत्मा जतन करून ठेवण्यासारखी, व्याख्येची कमतरता असलेली सर्वत्र फैलावलेली तापदायक बाब आहे, हा सर्व दिशेनं चिंताग्रस्त होण्याचा प्रकार आहे.

         साहित्य अशा काही क्षेत्रांपैकी एक आहे, जे आपल्याला अस्तित्वात असलेल्या जगाच्या कठोर तथ्यांसोबत जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतं. कारण त्याच्या स्वभावामुळं ते नेहमीच 'मनोवैज्ञानिक' असतं. कारण ते एखाद्या पात्राच्या अंतर्गत तर्कांवर आणि हेतूंवर लक्ष केंद्रित करतं. दुसर्‍या व्यक्तीचे असाध्य अनुभव प्रकट करतं किंवा सामान्यतः वाचकाला त्याच्या वागणुकीचं मानसिक स्पष्टीकरण देण्यास उद्युक्त करतं. केवळ साहित्यच आपल्याला दुसर्‍या व्यक्तीच्या जीवनात खोलवर प्रवेश करू देतं. त्याचे युक्तिवाद समजून घेऊ शकतं. त्याच्या भावना सामूहिक करू शकतं. त्याचं भाग्य अनुभवू शकतं.

          कथा नेहमीच अर्थाभोवतीच्या वर्तुळात फिरत असते; जरी तो अर्थ स्पष्टपणे व्यक्त होत नसला तरीही. जेव्हा तो हेतुपुरस्सर अर्थाचा शोध नाकारतो आणि फॉर्मवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो प्रयोग वाक्यांशाच्या विरोधात बंड करतो, तसेच अभिव्यक्तीचे नवीन मार्ग शोधतो. आपण वर्तनवादी नसलेली, काटकसरीनं लिहिलेली कथा वाचतो, तेव्हासुद्धा आपण प्रश्न विचारण्यास मदत करू शकत नाही: हे असं का घडत आहे?”, "याचा अर्थ काय आहे?", "यामुळं काय होतं?”, “याचा अग्रभाग कुठं आहे?” हे देखील शक्य आहे की आपल्या मनानं एखाद्या कथेत आपल्या आसपासच्या कोट्यवधी उत्तेजनांना अर्थ देण्याच्या प्रक्रियेच्या रूपाला विकसित केलं आहे आणि निद्राधीन अवस्थेतही ते सतत आणि अथकपणे त्याचं कथन योजतं. म्हणून कथा वेळेच्या आत माहितीच्या असीम मार्गाचं आयोजन करते. ती भूत, वर्तमान आणि भविष्याचा संबंध प्रस्थापित करते. पुनरावृत्ती उघड करते. हेतू व उद्देश यांची व्यवस्थित विभागणी करून मांडते. या कामात मन आणि भावना दोघेही भाग घेण्याचा प्रयत्न करतात.

        यात काही आश्चर्य नाही की कथेच्या सुरुवातीच्या शोधांपैकी एक शोध म्हणजे नशीब होते, जे नेहमीच भयानक आणि अमानुष म्हणून सांगितलं जाण्याऐवजी अस्तित्वातील सुव्यवस्था आणि स्थिरता देखील ओळखते.


सभ्य महिला आणि पुरुषांनो,

        छायाचित्रामध्ये असलेली स्त्री, जी माझी आई आहे. मी अजून जन्माला आले नसतानाही, माझी आतुरतेने वाट पाहत होती. काही वर्षांनंतर तिनं माझ्यासाठी परीकथा वाचल्या.

        हांस ख्रिस्तियन अँडरसन[17] यांच्या कथांपैकी एका कथेतील, कचर्‍याच्या ढिगार्‍यावर फेकल्या गेलेल्या एका किटलीनं[18] लोकांनी तिला दिलेल्या क्रूर वागणुकीची तक्रार केली आहे तिचा कान तुटताच त्यांनी लवकरात लवकर तिला निकालात काढून टाकलं. जर ते अशी पूर्णत्वाची मागणी करणारे नसते तर ती अजूनही उपयुक्त ठरू शकली असती. इतर तुटलेल्या वस्तूंनी तिचाच कित्ता गिरविला आणि वस्तुस्थिती म्हणून त्यांच्या माफक लहान आयुष्याबद्दलच्या खर्‍याखुर्‍या कथा सांगितल्या.

        रडून लाल झालेल्या गालांनी आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी मी लहानपणी ही परीकथा ऐकली. कारण माझा असा विश्वास आहे, की वस्तूंमध्ये त्यांच्या समस्या, भावना आणि काहीएक सामाजिक जीवन असतं; जे माणसांशी तुलना करण्याजोगं आहे. कपाटातील ताटल्या एकमेकांशी बोलू शकतात. टेबलाच्या खणातील चमचे, सुर्‍या आणि काटे यांचं एक प्रकारे कुटुंब बनतं. त्याचप्रमाणे प्राणी रहस्यमय, शहाणे, आत्म-जागरूक जीव होते. ज्यांच्याशी आपले नेहमीच दृढ आध्यात्मिक बंध होते आणि त्यांच्याशी आपण सखोल साम्य ठेवतो. परंतु अगदी नद्या, वनं आणि रस्ते यांचंसुद्धा अस्तित्व होतं ते जगाचे नकाशे लावणारे आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारे जिवंत प्राणी होत. त्यांनी आपल्यात रहस्यमय रॅमगेइस्टची[19] भावना निर्माण केली. आपल्या सभोवतालच्या रमणीय भूप्रदेशामध्ये सूर्य, चंद्र तथा सर्व खगोलीय - संपूर्ण दृश्यमान आणि अदृश्य जग जिवंत होतं.

        मी याबद्दल शंका घ्यायला कधी सुरुवात केली? मी माझ्या आयुष्यातील त्या क्षणाचा शोध घेतला: तेव्हा एका झटक्यात सगळं काही वेगळं, कमी महत्त्वाचं आणि सोपं झालं. कुजबुजणारं जग शांत झालं; त्याऐवजी शहरांचा गोंगाट, संगणकांची टकटक, ढगांच्या गडगडाटागत आवाज करत उडत जाणारी विमानं आणि माहितीच्या महासागराचा थकवणारा पांढरा आवाज आदींनी जागा घेतली.

         आपल्या जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपण जगाकडं तुकड्यांमध्ये पाहतो; सर्वकाही स्वतंत्रपणे. त्या एकमेकांशिवायच्या छोट्या आकाशगंगा आहेत, त्याद्वारे आपण ज्या वास्तवात राहत आहोत, त्याबद्दल आपले दृश्य दृढ करतात: आपल्याला डॉक्टरांकडून वैशिष्ट्यपूर्ण वागणूक मिळते. ज्या रस्त्यावर आपण गाडी चालवत आहोत, त्या रस्त्यांवरील बर्फ हटविण्याशी टॅक्सचा काहीही संबंध नाही. आपल्या दुपारच्या जेवणाचा शेतीवाडीशी काही संबंध नाही आणि माझा नवीन टॉप आशियातल्या कुठल्यातरी जर्जर कारखान्यातून आला आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकांपासून वेगळी असते, इतर सर्व गोष्टींपासून विभक्त जगते, कुठल्याही संबंधांशिवाय.

        आपल्या अस्तित्वाच्या सुलभतेसाठी आपल्याला संख्या, नेम टॅग्स, ओळखपत्रं अशी अपक्व प्लास्टिकची ओळख दिली गेली आहे, जी या संपूर्ण गोष्टींचा छोटासा तुकडा वापरण्यासाठी आपले रूप बदलण्याचा प्रयत्न करते; ज्याकडं आपण लक्ष देणं बंद केलं आहे.

        जग संपुष्टात येत आहे आणि आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही. आपल्या हेही लक्षातही येत नाही, की जग गोष्टी आणि घटनांचा संग्रह बनत आहे. एका मृतप्राय जागेत आपण एकाकीपणे भटकत आहोत आणि कुणाच्या तरी निर्णयानुसार इकडं-तिकडं फेकले जात आहोत. आपल्याला एखाद्या अकल्पित नियतीनं गुलाम केलं आहे, ऐतिहासिक शक्तींचा किंवा संधीचा खेळ होण्याची भावना आहे. आपलं अध्यात्म एकतर अदृश्य झालं आहे किंवा सोपस्कारी तसंच कर्मकांडी बनलं आहे. किंवा आपण फक्त सामान्य शक्तींचे अनुयायी बनलो आहोत- शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक. जोपर्यंत आपण झॉम्बीसारखे आहोत तोपर्यंत ते आपल्या भोवती फिरत राहतात आणि अशा जगात आपण खरोखरच झॉम्बी आहोत.

       म्हणूनच मी त्या इतर जगासाठी, किटलीच्या जगाची वाट पाहत आहे.


       सामान्यतः माझं संपूर्ण आयुष्य परस्परसंबंधांच्या प्रणालीमुळं आणि आपण अनभिज्ञ असलेल्या प्रभावामुळं भारून गेलं आहे. परंतु आपण योगायोगानं जे शोधतो, आश्चर्यकारक योगायोग म्हणून किंवा नियतीचे अभिसरण म्हणून, ते सर्व पूल, नट्स, बोल्ट्स तापवून एकजीव केलेले तुकडे आणि त्यांची जोडणी आहे, या सगळ्यांचा मी विमान उड्डाणादरम्यान पाठपुरावा केला. मी तथ्यांच्या सांगडीच्या माध्यमातून आणि आज्ञांच्या शोधाद्वारे संमोहित झाले आहे. आधारास्तव मला पटलं आहे की- लेखकाचं मन हे कृत्रिम मन आहे, जे निग्रहपूर्वक छोटछोटे तुकडे जमा करून त्यांना एकत्र चिकटवून संपूर्ण जगाची निर्मिती करतं. 

         आपण कसं लिहावं, जगाच्या नक्षत्रीय प्रारूपात (constellation) आपल्या कथेची महानता वाढवण्यासाठी तिची सक्षम रचना कशी करावी

        स्वाभाविकपणे मला जाणीव झाली आहे, की जगाबद्दलच्या अस्तित्वात असलेल्या मिथक, दंतकथा आणि प्रख्यात कथा (legends), ज्या मौखिक संप्रेषण करतात, जगाचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कथांकडं परत येणं अशक्य आहे. सध्याची कथा अधिक बहुआयामी आणि क्लिष्ट असावी लागेल. शेवटी, आपल्याला खरोखर बरंच काही माहीत आहे, त्या गोष्टींमधल्या वेगळेपणाच्या अविश्वसनीय संबंधांबद्दलची जाणीव आहे.


        चला जगाच्या इतिहासातील एका विशिष्ट क्षणाकडं बारकाईनं नजर टाकुयात.

       ३ ऑगस्ट १९४२ रोजी, सॅंता मरिया नावाचं छोटं डोलकाठ्यांचं जहाज स्पेनमधील पालोस बंदराच्या धक्क्यावरून प्रवासाला सुरुवात करतं. ख्रिस्तोफर कोलंबसकडं या जहाजासंबंधित सर्वाधिकार आहेत. सूर्य चमकत आहे. धक्क्यावर खलाशी इकडून तिकडं ये - जा करताहेत आणि बंदरावरील कामगार शेवटचा लाकडी खोका फळीवर ठेवून पुरवठा करत आहे. तिथे उष्णता आहे, परंतु पश्चिमेकडून वाहणारी मंदशी वार्‍याची झुळूक निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना बेशुद्ध होण्यापासून वाचवते. सीगल्स पक्षी रूबाबदारपणे सामान चढवण्याच्या फळीवर वर - खाली करत मानवी क्रियांचं बारकाईनं निरीक्षण करत आहेत.

       कालांतरानं या क्षणाला ओलांडून आपण पाहतो, की जवळपास ६० दशलक्ष अमेरिकन नागरीकांपैकी ५६ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. त्या वेळी, ते जगातील एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करत होते. युरोपियन लोक नकळत त्यांच्याबरोबर प्राणघातक भेटवस्तू घेऊन आले - रोग आणि जीवाणू यांचा प्रतिकार करण्यासाठी मूळ अमेरिकन रहिवाशांकडं रोग प्रतिकारशक्ती नव्हती. सर्वोच्च पातळीवर तेथील निर्दयी गुलामगिरी आणि हत्या आहे. तेथील विध्वंस वर्षानुवर्षे चालू राहिला आणि जमिनीचा मूळ पोतच बदलून गेला. जिथं सोयाबीन, धान्य, बटाटे आणि टोमॅटोंची लागवड केल्यानंतर एकदा का ते उगवले, की शेतजमिनीला अत्याधुनिक मार्गानं सिंचन केलं जातं, तेव्हा तिथं जंगली झाडं-झुडपं पुन्हा उगवले. काही वर्षांतच जवळपास १५० दशलक्ष एकर लागवड करण्यास योग्य जमीन जंगलात परावर्तीत झाली.

       पुनर्जीवित झाल्यावर वृक्ष-वनस्पतींनी खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड सेवन केला, अशा प्रकारे वनस्पतींच्या वाढीसाठी असलेल्या हरितगृहाचा (greenhouse) प्रभाव कमी झाला आणि त्यामुळे पृथ्वीचे जागतिक तापमान कमी झाले.

       युरोपमधील लहान हिमयुगाच्या प्रारंभिक अस्तित्वाच्या संदर्भात विश्लेषण करणारी विविध वैज्ञानिक गृहीतकं आहेत. ज्याने सोळाव्या शतकाच्या शेवटी हवामानाचे दीर्घकाळ टिकणारे शीतकरण केले.

        किरकोळ हिमयुगामुळे युरोपची अर्थव्यवस्था मूलतः बदलली. पुढील  दशकांत दीर्घ, गोठलेला हिवाळा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळं पारंपरिक शेतीचं उत्पादन घटलं. पश्चिम युरोपमध्ये, स्वतःच्या गरजेपोटी अन्न उत्पादन करणारी छोटी कुटुंबं शेतीसाठी अपुरी असल्याचं सिद्ध झालं. उपासमारीच्या लाटा सुरू झाल्या आणि उत्पादनांमध्ये विशेषता आणण्याची गरज निर्माण झाली. इंग्लंड आणि हॉलंड हे अतिशय वाईटरीत्या थंड वातावरणानं प्रभावित झाले होते; त्यांची अर्थव्यवस्था यापुढे शेतीवर अधिक अवलंबून राहू शकत नसल्यामुळे, त्यांनी व्यापार आणि उद्योग विकसित करण्यास सुरुवात केली. वादळाच्या धोक्याच्या मिळालेल्या त्वरित पूर्वसूचनेमुळं डचांनी समुद्राच्या उगमाजवळच्या जमिनीच्या तुकड्याला (polder) कोरडं करण्याचं काम केलं आणि दलदलीच्या प्रदेशाचं व सागरी क्षेत्रातील उथळ जागेचं जमिनीत रूपांतर केलं. दक्षिणेकडील कॉड वास्तव्य करत असलेल्या प्रदेशाची जागा बदलली, जे स्कॅन्डिनेव्हियासाठी विनाशकारी होतं, परंतु इंग्लंड आणि हॉलंडसाठी हे फायद्याचं सिद्ध झालं- यामुळे त्या देशांना नौदल आणि व्यापार व वाणिज्यविषयक शक्ती वाढवण्याची परवानगी मिळाली. विशेषतः स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये प्रत्यक्षपणे थंड तापमानात महत्त्वपूर्ण घट झाल्याचं दिसून आलं. ग्रीनलँड आणि आइसलँडबरोबरचा संपर्क तुटला, जोरदार हिवाळ्यामुळे कापणी कमी झाली आणि वर्षानुवर्षांची उपासमार व अन्नधान्य टंचाई निर्माण झाली. अशा प्रकारे स्वीडनने लोभी बनत आपली दृष्टी दक्षिणेकडं वळवली, पोलंडविरुद्ध युद्ध सुरू केलं (मुख्यतः बाल्टिक समुद्र गोठल्यामुळं, त्या मार्गानं लष्कराकडे कूच करणं सोपं होतं) आणि युरोपमधील तीस वर्षांच्या युद्धामध्ये सहभागी झाला. 

        वस्तुस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन स्थापित करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून असं दिसून येतं की, ते परस्पर एक तर्कसंगत, सूक्ष्मतेनं जोडलेल्या प्रभावाची प्रणाली असल्याचं दर्शवितात. हे केवळ आपल्याला माहीत असलेल्या प्रसिद्ध "बटरफ्लाय इफेक्टबद्दल"[20] नाही. या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात कमीतकमी बदलांमुळे भविष्यात अवाढव्य परिमाणांचे अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतात, परंतु इथं आपल्याकडं असंख्य फुलपाखरं आणि त्यांचे पंख अजूनही आहेत. जीवनाची एक गतिमान शक्तिशाली लहर जी काळानुसार प्रवास करते. 

         माझ्या दृष्टीने, "बटरफ्लाय इफेक्टच्या शोधामुळे, आपला स्वतःच्या क्षमतांवरील अढळ विश्वास परिणामकारक असल्याचं दिसतं. आपलं नियंत्रण सामर्थ्य आणि त्याद्वारे वर्चस्वाची भावना निर्माण करण्यासारखं प्रतीक असलेलं मानवी श्रद्धेचं युग संपुष्टात येतं. हे आपलं निर्माण करण्याचं, विजेता आणि शोधकर्ता होण्याचं असं सक्षम सामर्थ्य मानवजातीपासून काढून घेता येत नाही, अद्यापपर्यंत मानवजातीनं कल्पनाही केली नव्हती, त्या विचारापेक्षा वास्तविकता अधिक गुंतागुंतीची आहे हे स्पष्ट करते. आणि आपण या प्रक्रियेतला फक्त एक छोटासा भाग आहोत, बाकी काहीच नाही. 

      आपल्याकडे जगभरातील नेत्रदीपक, काहीवेळा अतिशय आश्चर्यकारक परावलंबित्वाच्या अस्तित्वाचे अधिकाधिक पुरावे आहेत.

       भौतिकशास्त्रातील नियमांद्वारे शासित असलेल्या एकाच जागेमध्ये आपण सर्व- लोक, वनस्पती आणि भौतिक वस्तूंनी गुरफटलेलो आहोत. या सामान्य जागेला स्वतःचा एक आकार आहे आणि त्यामध्ये भौतिकशास्त्राचे नियम निरंतर एकमेकांचा उल्लेख करत असलेल्या असंख्य संख्येला जन्म देतात. आपली रक्ताभिसरण प्रणाली नदीच्या पात्रातील प्रणालींसारखीच आहे. पानांची रचना मानवी संप्रेषण प्रणालीसारखी आहे. आकाशगंगेची हालचाल आपल्या वॉशबेसिनमधून वाहणार्‍या पाण्याच्या भोवर्‍यासारखी आहे. सूक्ष्म जीवाणूंच्या वसाहतीप्रमाणेच समाज विकसित होतो. सूक्ष्म आणि प्रचंड प्रमाण समानतेची अंतहीन प्रणाली दर्शविते. आपले भाषण, विचार आणि सर्जनशीलता यात काहीच अमूर्त नाही, जे जगामधून काढून टाकलं आहे, परंतु इतर स्तरावरील विस्तार ही परिवर्तनाची अंतहीन प्रक्रिया आहे.  


       मला आश्चर्य वाटतं की या दिवसांमध्ये व्यापक, सर्वसमावेशक निसर्गामध्ये रुजलेल्या, संदर्भांनी परिपूर्ण आणि त्याच वेळी समजण्याजोग्या वैश्विक नव्या कथेचा पाया शोधणं शक्य झालं आहे.

       जी आपल्या स्वत:च्या विसंवादाच्या तुरुंगापलीकडे जाईल, जी वास्तवाची एक विस्तृत श्रेणी प्रकट करेल आणि परस्परसंबंध दर्शवेल, अशी एखादी कथा असण्याची शक्यता आहे का? सर्वत्र सामायिक मताला पायदळी तुडवू शकणारी, स्पष्ट आणि जाहीर केंद्रापासून स्वत:ला दूर ठेवू शकणारी तसेच केंद्रापासून दूर असलेल्या गोष्टींकडे पूर्व-केंद्रितपणे पाहण्यास मजबुर करू शकणारी कथा आपल्याकडे आहे का?

         मला आनंद वाटतो की साहित्यानं एका विलक्षण मार्गानं सर्व प्रकारचा विक्षिप्तपणा, कल्पनारम्य कथा, चिथावणी देणारं विडंबन आणि वेडाचाराचा हक्क जतन केला आहे. मी वैश्विक आणि व्यापक दृष्टिकोनांचं स्वप्न पाहते, जिथं संदर्भ अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. मी अशा भाषेचं स्वप्न पाहत आहे, जिच्यात संदिग्ध अंतर्ज्ञान व्यक्त करण्याची क्षमता आहे. मी अशा रूपकाचं स्वप्न पाहत आहे, जे सांस्कृतिक भिन्नता दूर करेल तसेच शेवटी प्रशस्त शैली आणि मर्यादांचं उल्लंघन करेल आणि त्याच वेळी वाचकांनाही आवडेल. 

         मी एका नवीन प्रकारच्या कथनकाराचं स्वप्न देखील पाहिलं आहे एक अन्य पुरुषी निवेदकजो अर्थातच केवळ व्याकरणात्मक रचना नाही तर त्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो- तो प्रत्येक पात्राचा दृष्टिकोन नियंत्रित करतो, तसेच त्यातील प्रत्येक क्षितिजापार जाण्याची क्षमता ठेवतो. जो अधिकाधिक आणि व्यापकपणे पाहतो. जो काळाकडे दुर्लक्ष करण्यास सक्षम आहे. होय, मला वाटतं की, अशा निवेदकाचे अस्तित्व शक्य आहे.

         तुम्ही कधी विचार केला आहे का, की ज्याने मोठ्या आवाजात हाक मारली तो बायबलमधील अद्भुत कथनकर्ता कोण आहे: "सुरुवातीचा शब्द कोणता होता"? जगाच्या निर्मितीचे वर्णन करणारा कथनकर्ता कोण आहे, हा पहिला दिवस आहे, जेव्हा अनागोंदी क्रमापासून विभक्त केली गेली, तेव्हा अंतराळ निर्मितीच्या मालिकेचं अनुसरण कोण करत आहे, देवाचे विचार कोणाला माहीत आहेत, त्याच्या शंकेबद्दल कोणाला माहीत आहे? स्थिर हात कागदावर पुढील अविश्वसनीय वाक्यांश ठेवतात: आणि देवानं पाहिलं की ते चांगलं होतं”? हा कोण आहे, देव काय विचारतो हे कोणाला माहीत आहे?

         परतत्त्व ज्ञानविषयक सर्व शंका बाजूला ठेवून आपण रहस्यमय आणि संवेदनशील निवेदकाची ही आकृती अद्भुत आणि लक्षणीय म्हणून लक्षात घेऊ शकतो. हा एक दृष्टिकोन आहे; असा दृष्टिकोन ज्यामधून सर्वकाही पाहिलं जाऊ शकतं. सर्व काही पाहण्याचा अर्थ म्हणजे अस्तित्वात असलेल्या एका समग्रतेमधील प्रत्येक परस्परसंबंधित गोष्टींमधील मूलभूत तथ्य ओळखणं, जरी त्यांच्या दरम्यानचे संबंध आपल्याला अद्याप माहीत नसले तरी. सर्व काही पाहणं म्हणजे जगासाठी एक पूर्णतः वेगळी जबाबदारी देखील आहे, कारण हे स्पष्ट होतं, की प्रत्येक 'इथं' मधील भाव 'तिथं'शी जोडला गेला आहे, जसं की जगाच्या एका भागात घेतलेल्या निर्णयाचा परिणाम दुसर्‍या भागात होईल आणि त्यामुळे 'माझं' आणि 'आपलं' मधील फरक विवादास्पद ठरू शकतो.

        अशा प्रकारे वाचकाच्या चेतनेत संपूर्णतेची भावना निर्माण होईल. त्या तुकड्यांची सर्वसाधारण रचना एकत्रित करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी आणि घटनांच्या छोट्या कणांमध्ये संपूर्ण ग्रहाचा (constellation) शोध घेण्यासाठी प्रामाणिकपणे कथा सांगणे आवश्यक आहे. अशा कथा सांगा ज्यायोगे हे स्पष्ट होईल, की सर्वकाही आणि प्रत्येकजण एकाच आणि समान संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे, जे आपण ग्रहगोलाच्या प्रत्येक वळणासोबत आपल्या मनात परिश्रमपूर्वक निर्माण करतो.

        हे करण्याची शक्ती साहित्यात आहे. आपण अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य, लोकप्रिय आणि अल्पजनांचे (niche) साहित्य असे सोपे वर्गीकरण करणे सोडले पाहिजे. जेणेकरून आपल्याला शैलीतील विभागणी करून घेता येईल. 'राष्ट्रीय साहित्यिक' ही व्याख्या आपण सोडून दिली पाहिजे. या संपूर्ण जागरूकतेने की विश्व हा साहित्याचा एक सामायिक विचार आहे, ज्यामध्ये आपले सामायिक अनुभव (Unus mundus[21]) एकत्रित केलेले आहेत. ते एक सामान्य मनोवैज्ञानिक वास्तव आहे, ज्यात आपला मानवी अनुभव एकत्रित होतो. लेखक आणि वाचक निर्मितीच्या प्रभावामुळे, अर्थाचा खुलासा करून नंतर एक समान भूमिका बजावतात.

         कदाचित आपण या तुकड्यावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे, कारण तुकड्यांमुळे ग्रह (constellation) तयार होतात; जे अधिक विस्तृत, गुंतागुंतीच्या मार्गानं, बहुआयामी वर्णन प्रदान करण्यास सक्षम आहेत. आपल्या कथा एकमेकांशी असीम संबंध ठेवू शकतात आणि त्यांची केंद्रिभूत पात्रं एकमेकांशी संवादी राहू शकतात.

         मला वाटतं, की आजकाल आपल्याला वास्तववादाच्या संकल्पनेनुसार जे समजलं आहे त्याआधी आपल्याकडं एक पुनर्व्याख्या आहे आणि एक नवीन शोध, ज्यायोगे आपण आपल्या अहंकाराच्या मर्यादेपलीकडं जाऊ शकतो. काचेच्या स्क्रीनवर प्रवेश करून जग पाहतो. कारण वास्तवाची गरज ही अशी एक गोष्ट आहे, जी आज सोशल मीडिया आणि अप्रत्यक्ष आंतरजालीय नातेसंबंधांद्वारे माध्यमांनी पुरवली आहे. कदाचित आपल्यासमोर एखाद्या प्रकारचा नव-अस्तित्ववाद, नव्याने परिभाषित केलेले दृष्टिकोन, ज्यामुळे विरोधाभासाला सामोरं जाण्याची भीती वाटणार नाही, या बाबी अपरिहार्य आहेत. जेव्हा वर्तमानाला कारणं आणि परिणाम देण्याचा सोपा क्रम येतो, तेव्हा त्या विरुद्ध जाता येईल. खरंच आपलं वास्तव यापूर्वी सत्य बनलं आहे. मलाही तितकीच खात्री आहे, की नव्या वैज्ञानिक सिद्धांतांनी प्रेरित होऊन आपल्या नव्या बौद्धिक संदर्भात बऱ्याच कथांचे पुनर्लेखन करण्याची गरज आहे. परंतु पौराणिक कथेचा आणि संपूर्ण मानवी कल्पनांचा अविरतपणे संदर्भ घेणंही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. पुराणकथांच्या संक्षिप्त रचनेकडं परत आल्यानं आजच्या जगातल्या या अनिश्चिततेमध्ये स्थिरतेची भावना निर्माण होऊ शकते. माझा विश्वास आहे, की पौराणिक कथा ही मानवी मनासाठी आधारभूत सामग्री आहे; त्याकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही (जास्तीत जास्त, आपण त्यांच्या प्रभावाबद्दल अनभिज्ञ असू शकतो). 

        यात काही शंका नाही की एक प्रतिभावंत व्यक्ती लवकरच येईल, जी आजही पूर्णपणे अकल्पनीय, भिन्न कथा तयार करण्यास सक्षम असेल, ज्यामध्ये संबंधित सर्व काही सामावून घेता येईल. कथा सांगण्याची ही पद्धत आपल्यात नक्कीच बदल करेल, आपण आपल्या जुन्या, संकुचित दृष्टिकोनांचा त्याग केला पाहिजे आणि प्रत्यक्षात नेहमीच कुठंतरी अस्तित्वात असलेल्या नवीन गोष्टी उघडल्या पाहिजेत, परंतु आपण त्यांच्याकडे पाहतच नाही.

         डॉक्टर फाउस्टस या कादंबरीमध्ये थॉमस मान[22] यांनी एका संगीतकाराविषयी लिहिलं आहे. ज्यानं मानवी विचार बदलण्यासाठी सक्षम असलेल्या निरपेक्ष संगीताचं एक नवीन रूप तयार केलं. परंतु हे संगीत कशावर आधारित आहे, याचं वर्णन मान यांनी केलं नाही. ते फक्त कसं वाजेल याची कल्पना त्यांनी तयार केली. कदाचित कलाकारांची भूमिका यावरच अवलंबून असते - अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा पूर्वानुभव देणं आणि अशा प्रकारे ते कल्पित होतं. कल्पना करणं ही अस्तित्वाची पहिली पायरी असते.

 

        मी कल्पित साहित्य लिहिते, परंतु ही लिहिण्याची प्रक्रिया कधीच शुद्ध नसते. जेव्हा मी लिहिते, तेव्हा मी माझ्या आतमध्ये सर्वकाही अनुभवते. पुस्तकात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्ती आणि वस्तू, मानवी आणि मनुष्यत्वापलीकडे असलेले सर्व काही, सजीव किंवा निर्जीव अशा प्रत्येक गोष्टीतून मी स्वतःच्या आतील भागात जाणं आवश्यक आहे. मी प्रत्येक गोष्टीकडं आणि व्यक्तीकडं अगदी बारकाईनं, गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी स्वतःच्या आत व्यक्त केल्या पाहिजेत, माझ्यामध्ये रुजवल्या पाहिजेत.

      त्याच ठिकाणी संवेदनशीलता मला सेवा देते कारण संवेदनशीलता म्हणजे व्यक्तिमत्त्वाची कला आहे, भावनेचं आदानप्रदान आणि निरंतर समानता शोधण्याची कला आहे. कथा निर्माण करण्याचा अर्थ आहे, की सातत्यानं जीवनात एक अविनाशी पुनरुज्जीवन करणं. जगाच्या सर्व छोट्या तुकड्यांना अस्तित्व देण्याचं; लोक ज्या परिस्थितीत टिकून आहेत त्या घटना आणि त्यांच्या आठवणींचं मानवी अनुभवांनी प्रतिनिधित्व केलं आहे. मी संवेदनशीलतेसंदर्भातील सर्व गोष्टींना स्वतःत रुजवते, त्यांस आवाज देणं शक्य करते, त्याला अस्तित्वात येण्यासाठी स्थान आणि वेळ देते आणि स्वतःला व्यक्त करण्याची अनुमती देते. ही संवेदनशीलताच आहे, जिच्यामुळे चहाच्या किटलीनं बोलण्याला आरंभ केला, त्यामुळं तिचे आभार.

        संवेदनशीलता हे प्रेमाचं सर्वात नम्र रूप आहे. या प्रकारचं प्रेम जे लिखित स्वरूपाच्या शास्त्रांमध्ये किंवा आपण खरी मानतो त्या तत्त्वांमध्ये दिसून येत नाही. कोणीही शपथ घेत नाही. कोणीही उद्धृत करत नाही. यात विशेष असे प्रतीक आणि चिन्हं नसतात, गुन्हा किंवा मत्सरही असत नाही.

        जेव्हा जेव्हा आपण सूक्ष्म आणि काळजीपूर्वक दुसर्‍याच्या अस्तित्वाकडं लक्ष देतो, तेव्हा असं काही जे आपल्या 'स्वतः'चं नाही ते दिसतं.   

         संवेदनशीलता ही उत्स्फूर्त आणि निरपेक्ष आहे; हे सहानुभूतीच्या सहकारी भावनेच्या खूपच पलीकडचं आहे. त्याऐवजी थोडीशी खिन्नता आणि सामान्य नियती सामायिक करणारी ही जाणीव आहे

        संवेदनशीलता ही दुसर्‍या व्यक्तीबद्दल तीव्र भावनात्मक चिंता, तिचा कमकुवतपणा, तिचं अनन्य स्वरूप, त्रास सहन करण्याच्या प्रतिकारशक्तीचा अभाव आणि काळाच्या परिणामाबद्दलची गंभीर भावना असते.

        संवेदनशीलता आपल्या दरम्यानचे बंध, आपल्यातील साम्य आणि तोचतोचपणा समजून घेते. जग पाहणं, जगणं, एकमेकांशी जोडलं जाणं, सहकार्य करणं आणि स्वतःवर अवलंबून असणं हे जगाला दर्शविण्याचा एक मार्ग आहे.

       ही संवेदनशीलता आपल्याशिवाय इतर कोणत्याही अस्तित्वाला दर्शविण्यासाठी साहित्य बनलेलं असतं. ही कादंबरीची मूलभूत मानसिक यंत्रणा आहे. मानवी संप्रेषणाचं सर्वात अत्याधुनिक साधन म्हणजे आपले अनुभव वेळोवेळी प्रवास करू शकतात, ज्यांचा जन्म अद्याप झाला नाही अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतात, या आश्चर्यकारक साधनाबद्दल धन्यवाद. परंतु एक दिवस आपण लिहिलेल्या कथांकडे कोण वळेल; अशा कथा ज्या आपल्याबद्दल आणि आपल्या जगाबद्दल आपण सांगितल्या आहेत.

       त्यांचं जीवन कसं असेल किंवा ते कोण असतील याची मला कल्पना नाही. मी सहसा त्यांच्याबद्दल लाज आणि अपराधभावानं विचार करते.

         ज्या हवामान अणीबाणी आणि राजकीय संकटात आज आपले मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ज्याला आपण जगाचा बचाव करून विरोध करण्यास उत्सुक आहोत, तो कुठूनही बाहेरून आला नाही. आपण बर्‍याचदा विसरतो, की हे भाग्य किंवा नियतीचे वळण नाही तर अतिशय विशिष्ट आर्थिक, सामाजिक व वैचारिक (धार्मिक गोष्टींच्या समावेशासह) कृती आणि निर्णयांचा परिणाम आहे. लोभ, निसर्गाप्रतीच्या आदरातील अपयश, स्वार्थ, कल्पनेचा अभाव, अंतहीन स्पर्धा आणि बेजबाबदारपणामुळे जगाच्या अस्तित्वाचे तुकडे केले जाऊ शकतात आणि त्यांचा वापर होऊन नाश होऊ शकतो.

         म्हणूनच माझा असा विश्वास आहे की जगाचं एक सजीव, एकल अस्तित्व आहे, जे सतत आपल्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे आणि आपण त्याच वेळी त्यातील एक छोटा पण शक्तिशाली भाग आहोत. याबद्दल मी कथा सांगायला पाहिजे.

इंग्रजी भाषांतर - जेनिफर क्रॉफ्ट आणि अँटोनिया लॉयड-जोन्स

मराठी भाषांतर – प्रज्ञा सुधाकर भोसले

भाषांतरकाराच्या पुरवणी टिपा:



[1]. Boat Neck म्हणजे स्त्रियांच्या कपड्यांच्या गळ्याची मोठ्या बोटीच्या आकाराप्रमाणे रचना. 

[2]. अॅगोरा (Agora) म्हणजे अथेन्समधील लोकप्रिय सभेसाठी किंवा प्राचीन ग्रीसमधील असेंब्लीसाठी वापरले जाणारे कोणतेही ठिकाण.

[3]. लिव्हाइअथन (Leviathan) हा बायबलमध्ये वर्णन केलेला प्रचंड जलचर प्राणी आहे. अगडबंब, अजस्त्र वस्तू यांच्या संदर्भानेही लिव्हाइअथन हा शब्द वापरला जातो. याठिकाणी साहित्याच्या अवाढव्य स्वरूपाबाबत लिव्हाइअथन हा शब्द वापरला गेला आहे.

[4]. होमेरिक कथांचा (Homeric tales) प्रभाव पाश्चात्त्य संस्कृतीवर उमटलेला दिसतो. होमर हा ग्रीक महाकवी होता. त्याने इलियड आणि ओडिसी ही ग्रीक महाकाव्ये रचली.   

[5]. डेइउस ऐक्स मॅकिना (The Deus ex machina) म्हणजे वाङ्मयामधील विशेषतः कादंबरी किंवा नाटकामधील कोंडी फोडणारी अनपेक्षित शक्ती किंवा घटना. तसेच कल्पित कथानकातील कल्पना किंवा योजना होय.

[6]. शेहेरजादे हे हजारो कथा सांगणारे मध्य पूर्वेच्या कथात्मक साहित्याच्या चौकटीत बसणारे, कथाकथन करणारे प्रमुख महिला पात्र आहे. १००१ रात्री सांगितलेल्या १००१ कथा संपल्यानंतर शेहेरजादेने राजाला सांगितले की तिच्याकडे सांगायला अजून कसलीही कथा नाही. या १००१ रात्रीत राजा शेहेरजादेच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला आपली राणी बनवले. त्यामुळे शेहेरजादे हे पात्र पुराणकथांच्या अनुषंगाने प्रसिद्ध आहे. 

[7]. फॅबुला इंटरप्टा (The fabula Interrupta) म्हणजे कथेत असलेल्या घटनांची कालक्रमानुसार मांडणी. अपरिचित कथानकामुळे वाचकाचे लक्ष वेधले जाते आणि कथेला नकळत मार्गाने नवीन वळण मिळते.

[8]. जॉन अमोस कॉमेनिअस (John Amos Comenius) हे झेक तत्त्वज्ञानी होते. अध्यापक आणि आधुनिक शिक्षणाचे जनक मानले जाणारे जॉन मोराव्हियाच्या मार्गाव्हिएटमध्ये धर्मशास्त्रज्ञ होते.

[9]. पन्सोफिजम (Pansophism) ही बर्‍याचदा सर्वज्ञानाची संकल्पना म्हणून वापरली जाते. पेन्सोफी म्हणजे सर्वज्ञानी”. काही एकेश्वरवादी विश्वास प्रणालींमध्ये देवाला अंतिम ज्ञात आत्मा असे म्हटले जाते.

[10]. पेन्सोफिकली (Pansophically) म्हणजे सर्वज्ञानवादी. सर्वज्ञानाचा दावा करणार्‍या व्यक्तीला पॅन्सोफिकल म्हटले जाते.     

[11]. हंस कॅस्टॉर्प (Hans Castorp) हे थॉमस मान यांच्या 'द मॅजिक माऊंटन' (1924) या कादंबरीतील मुख्य काल्पनिक पात्र आहे. जो जर्मन अभियंता असतो.

[12]. अॅना कॅरेनिना (Anna Karenina) ही रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांची एक कादंबरी आहे. जी पहिल्यांदा पुस्तक स्वरूपात १८७८ मध्ये प्रकाशित झाली. बरेच लेखक आणि टॉलस्टॉय  स्वतः अॅना कॅरेनिनाया कादंबरीला आजपर्यंतचे सर्वात मोठे काम मानतात.

[13].  विनी द पूह (Winnie the Pooh) ज्याला पू बेअर आणि पूह देखील म्हटले जाते. हा एक काल्पनिक टेडी बियर (मुलांचे खेळण्यातील अस्वल) आहे, जो इंग्रजी लेखक ए. ए. मिलने यांच्या बालसाहित्यातील पात्र आहे. या पात्राविषयीच्या कथांचा पहिला संग्रह विनी-द-पूह हे पुस्तक आहे आणि त्यानंतर द हाऊस ऑफ पू कॉर्नरया शीर्षकाचंही त्यांनी पुस्तक लिहिलं.

[14].  डायनेस्टी (Dynasty) ही अमेरिकेतील प्राईम टाईम टेलिव्हिजन सोप ऑपेरा रीबूट आहे, जी डायनेस्टी याच नावाच्या १९८० च्या दशकाच्या मालिकेवर आधारित होती. या मालिकेत अमेरिकेतील दोन श्रीमंत कुटुंबे कॅरिंग्टन आणि कोल्बिस यांचा संघर्ष दाखविला आहे.

[15].  लारा क्राफ्ट (Lara Croft) हे एक काल्पनिक पात्र आहे. लारा क्राफ्ट ही टॉम्ब रायडर या चित्रपटाची आणि व्हिडिओ गेम फ्रेंचायझीची मुख्य नायिका आहे. तिला एक अत्यंत हुशार आणि अॅथलेटिक इंग्रजी पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून सादर केले आहे. जी जगभरातील पुरातन अवशेषांच्या शोधात प्रवास करते.

[16]. एडवर्ड मॉर्गन फोर्स्टर (E. M. Forster) एक इंग्रजी कादंबरीकार, लघुकथा लेखक व निबंधकार आहेत. अ रूम विथ अ व्हयू,’ ‘हावर्ड्स एंड आणि अ पॅसेज टू इंडियाअशा त्यांच्या कादंबर्‍या वर्गभेद आणि दांभिकतेचे वर्णन करणार्‍या आहेत.

[17]. हांस ख्रिस्तियन अँडरसन (Hans Christian Andersen) हे डेन्मार्कमधील डॅनिश लेखक होते. त्यांनी नाटक, प्रवासी कादंबर्‍या आणि कवितांचे विपुल लेखन केले असले तरी त्यांच्या काल्पनिक कथांमुळे ते सर्वपरिचित आहेत.

[18]. ‘The Teapot’ ही हांस ख्रिस्तियन अँडरसन यांची काल्पनिक कथा आहे. किटलीच्या (Teapot) साहसांबद्दलची ही एक साहसी परीकथा आहे. ही कथा प्रथम १८६३ मध्ये प्रकाशित झाली होती. या कथांमधून सामान्य घरगुती वस्तूंच्या संदर्भातील लेखकाची प्रतिभा झळकते.

[19]. रॅमगेइस्ट (Raumgeist) ही संकल्पना पर्यावरणाचा आत्मा तसेच सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ या दृष्टिकोनातून वापरली जाते. 

[20]. बटर फ्लाय इफेक्ट (Butterfly effect) मध्ये असं म्हणतात, ॲमेझॉन खोऱ्यात फुलपाखरांनी एकत्रितरीत्या एकाच वेळेस पंख फडफडवले तर अमेरिकेत वातावरण बदलतं किंवा भूकंप होतो.

[21].  लॅटिनमध्ये तयार झालेली अनस मुंडूस (unus mundus) ही एकीकृत वास्तवाची संकल्पना आहे. जिथून सर्व काही उदयास येते आणि ज्याकडे सर्व काही परत येते. २० व्या शतकात ही कल्पना स्विस मनोविश्लेषक कार्ल गुस्ताव युंग यांनी लोकप्रिय केली.

[22].  डॉक्टर फाउस्टस (Doctor Faustus) ही इ. स. १९४७ मध्ये प्रकाशित झालेली थॉमस मान (Thomas Mann) यांची जर्मन कादंबरी आहे. 

पूर्वप्रकाशित : चाक (अनियतकालिक) नोव्हेंबर -२०२० अंक - एक 



 Hyperlink - https://www.youtube.com/live/VvZAXL28K2E?si=bjYWfE2dk4DunlxL

https://www.facebook.com/share/p/a7cLm74a3WXeYK4a/

No comments:

Post a Comment

भाषांतर : संवेदनशील कथनकार

  ओल्गा तकारक्जुक  (नोबेल पुरस्कार, २०१८)         मी पहिल्यांदा कुठलं छायाचित्र जाणीवपूर्वक अनुभवलं असेल , तर ते माझ्या आईचं मला जन्म ...